सलुन व्यवसायीक बांधवांवर अन्याय.... तहसीलदार यांना निवेदन - दैनिक शिवस्वराज्य

सलुन व्यवसायीक बांधवांवर अन्याय.... तहसीलदार यांना निवेदन


जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
पोटाची खळगी भरण्यासाठी काबाडकष्ट करणार्‍या नाभिक समाज बांधवांवर अन्याय झाला असल्याची तक्रार शहरातील नाभिक समाज बांधवांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून गावातील काही नागरिकांनी छोटा मोठा व्यवसाय म्हणून दुकाने उभी केली आहे. त्या व्यवसायातुन व्यवसायाच्या  उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवायचे. त्या अतिक्रमण केलेल्या जागेवर गावातीलच नागरीकांनी व नाभिक समाज बांधवांनी सलुनचा व्यवसाय म्हणून दुकाने उभी केली होती. परंतु गावातुन पुढाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अतिक्रमण काढण्यासाठी अनेक तक्रारी  दिल्या होत्या. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कुणीही अतिक्रमण काढण्यासाठी आले नाहीत. पण अचानक ऐन पावसाळ्यात कोणतीही पुर्व सुचना न देता बांधकाम विभागाचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी व लवाजमा घेऊन आले. त्या जागेवर इतर दुकाने असतांना केवळ नाभिक समाज बांधवांना लक्ष करीत दबंगशाही पद्धतीने फक्त हि दोन दुकाने जेसीबी यंत्र लावुन जमीनदोस्त करण्यात आली आहे. दुकानातील साहित्याची मोडतोड करून सर्वत्र साहित्य शेजारील विहिरीत टाकून दिले. सलुन व्यवसायीकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करीत त्यांना रस्त्यावर आणले गेले आहे. उपजीविकेचे साधनच गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर दुकाने असतांना केवळ याच दोन दुकानांवर द्वेष भावनेतून कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोन्ही सलुनचा व्यवसाय करणाऱ्यांना अधिकार्‍यांनी अरेरावीची भाषा करुन तुम्ही आमचे काहीच करु शकत नाही. तुम्हाला जे काय करता येईल ते करा. असा सज्जड दम दिला. या धक्कादायक प्रकारानंतर  नाभिक समाजात संतापाची लाट उसळली आहे. नाभिक समाजाला हेतुपुरस्पर लक्ष करून पोटाची खळगी भरणार्‍याना रस्त्यावर आणणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी. व समाजाला न्याय द्यावा अशी मागणी व आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदन देताना चंद्रकांत शिंदे, नाना पवार, छोटु शिंदे, गोपाल जाधव, विजय जाधव, गजानन जाधव, किशोर जाधव, गोपाल शिंदे, योगेश शिंदे, राहुल राऊत, नंदकिशोर बिडके, रविंद्र न्हावी, मनोज न्हावी, कैलास वाघ, गजानन राऊत, राजेंद्र पाटील, प्रदीप भुसारी,   गणेश न्हावी, राहुल इंगळे, यांच्या सह अन्य समाज बांधव उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads