जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सवाचे आणि मुक्ताई सरस प्रदर्शनाचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते उदघाटन
जळगावकरांसाठी पाच दिवसांची सांस्कृतिक मेजवानी जळगावकरांनो प्रत्यक्ष अनुभती घ्या
- खा. उन्मेष पाटील यांचे आवाहन
महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी मुक्ताई सरस प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकार आणि राज्यातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून जळगाकरांनी आनंद घ्यावा.या बरोबरच जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे 'मुक्ताई सरस प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाला भेट देऊन या महिला बचत गटांना प्रोत्साहन द्या असे आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी केले.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे दि.28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देशाच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या त्यात गावागावात प्रशिक्षण देऊन ड्रोनदीदी तयार करणे, महिलांच्या बचत गटांना उमेदच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ सहाय्य,विकासासाठी अनेक योजना सुरु केल्याचे खा. उन्मेष पाटील यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव होत आहे.आज उदघाटन झाले, अजून चार दिवस आहेत, त्या महोत्सवाचा जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
स्थानिक कलाकार यांनी यावेळी वेगवेगळ्या कला सादर केल्या. त्यानंतर सुप्रसिद्ध ' महाराष्ट्राची हास्य यात्रा ' हा कार्यक्रम सुरु झाला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा