' माऊली ' जन्मक्षेत्र आपेगावच्या दिंडीचे ८४७ वे वर्ष !
पैठण, दि.२५
संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई यांचे जन्मस्थळ असलेल्या तीर्थक्षेत्र आपेगाव येथून २८ जून रोजी आषाढी पायी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या वारीची परंपरा 'माऊलीं'चे आजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी (जावळे) यांच्या अधिपासूनची असून, यंदा सोहळ्याचे ८४७ वे वर्ष आहे !
पंढरीची ही वारी तेराव्या शतकातील संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही अगोदरपासून होत असल्याचे दाखले मिळतात. मूळचे मराठवाड्यातील असलेल्या संत नामदेवांच्या घराण्यातही अनेक पिढ्यांची पंढरीची वारी होती. तर संत ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा त्र्यंबकपंतही आपेगाव या जन्मक्षेत्रातून पंढरीची वारी करत होते. पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास आणि परंपरा आहे. वारीचा उल्लेख असलेले संत ज्ञानदेवकृत अभंगातून कागदोपत्री ठोस आधार मिळतो. संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती. या सर्व ठोस पुराव्यावरून आपेगाव ते पंढरीची वारी गेल्या हजार-बाराशे वर्षापासून अखंड सुरू असल्याचे स्पष्ट होते. उन्हाळा संपतो आणि वारकऱ्यांना पंढरीची आस लागते. अभंग गात गात, खेळीमेळीने, आनंदाने, नाचत, गर्जत विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करतात. भजन गात, नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंड्या म्हणजे चैतन्याचा प्रवाहच. या दिंड्यांचे दृश्यही चित्त प्रसन्न करणारे असते.
या पाश्र्वभूमीवर आपेगाव ते पंढरपूर या पायी वारीचे यंदा ८४७ वेळ वर्ष आहे. संत ज्ञानेश्वर महराजांचे पणजोबा विठ्ठलभक्त त्र्यंबकपंत यांनी ती सुरू केली होती. त्र्यंबकपंतांना हरिहरपंत व गोविंदपंत अशी २ मुले होती. त्यापैकी हरिहरपंतांनी राजनैतिक परंपरा जोपासत देवगिरीचे यादव राजेसिंघल यांच्या दरबारी सरसेनापती पद भूषविले. तर गोविंदपंत यांनी वडिलांच्या भक्ती व ज्ञानमार्गाची कास धरली व उपासनेची परंपरा जोपासत ही पंढरपूरची वारी सुरू ठेवली. गोविंदपंत वृद्धापकाळी वारीला गेले असतानाच सोलापूर येथील सिद्धरामेश्वराच्या मंदिरात पांडुरंगाने साक्षात दर्शन दिले. तेथे त्यांनी देहत्याग केला. आजही सोलापूर येथे सिद्धरामेश्वराच्या मंदिरालगत गोविंदपंतांचेही मंदिर आहे. गोविंदपंतांच्यानंतर माऊली आदी भावंडांचे पिताश्री विठ्ठलपंतांनी ही वारी पुढे सुरू ठेवली. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनी तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या सोहळ्याला व्यापक स्वरूप दिले.
तळागाळातील समाजाला एकत्र
करून याच वारीचे दिंडीत रूपांतर केले. त्यामुळे पांडुरंगाची खरी वारी आपेगावहूनच सुरू झाली, असे मानले जाते. १९६५ ला गुरुअज्ञा पाळत कैवल्यमुर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर हे आपेगावी आले. १९६७ पासून त्यांनी दिंडीचे स्वरूप बदलले. त्याकाळी गावकरी माऊलींच्या पादुका डोक्यावर घेऊन दर कोस दर मुक्काम करत पायी वारी करत. कालांतराने या पायी वारीचे पालखी दिंडीत रूपांतर झाले. पंचक्रोशीतील विठ्ठलभक्त ज्ञानबाच्या भक्तिरसात पंढरीला जायचे. हिच परंपरा सुरू ठेवत संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमीतून भक्त त्र्यंबकपंतांनी सुरू केलेली आपेगावहून पंढरपूर पायी वारीला यंदा ८४७ वर्षे झाली आहेत. दरम्यान हीच समृद्ध परंपरा जोपासत संत ज्ञानेश्वर जन्मभूमी, आपेगाव माऊली मंदिर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर हे सक्रिय झाले आहेत. गुरूचे अज्ञा पालन करत माता पित्याचा पालखीरथ सोहळाही या पालखी रथ दिंडी सोहळ्यात समाविष्ट करण्यात आला आहे. यावर्षी २८ जून रोजी माऊलींचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ही दिंडी जन्मक्षेत्र आपेगाव येथे नगरप्रदक्षिणा करून माऊली मंदिरातच मुक्कामी विसावणार आहे. २९ रोजी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. बीड, नगर, धाराशिव व सोलापूर या जिल्ह्यांतील व ९ तालुक्यांच्या हद्दीतून मार्गक्रमण करत हा सोहळा आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे.
Previous article
Next article
माऊली की जय
उत्तर द्याहटवा