ग्रामपंचायत मधील सरपंच ग्रामसेवक यांनी केला लाखो रुपयांचा निधीचा अपहार....
नाशिक प्रतिनिधी
निवाने ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक, सरपंचासह पेसा अध्यक्ष या तिघांना कळवण पोलिसांनी अटक केली आहे. निवाने ग्रामपंचायत मधील निधी अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबतच पंचायत समितीतील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा सविस्तर काय आहे प्रकरण...
सन २०१६ ते २०२१ दरम्यान कळवण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निवाने ग्रामपंचायत मधील पेसा अंतर्गत व शासकीय योजनेतील निधीचा लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निवाने ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक भास्कर पुंजाराम बागुल (वय ५०, रा. अभोणा, तालुका कळवण), तत्कालीन सरपंच बेबीबाई शिवाजी सोनवणे (वय ५७, रा. निवाने, तालुका कळवण) तसेच पेसा अध्यक्ष यशोदाबाई विठोबा माळी (वय ६५, रा. निवाने तालुका कळवण) या तिघा विरोधात दि.१४ ऑगस्ट २०२३ रोजी कळवण पोलीस ठाण्यात ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी युवराज सयाजी सोनवणे (वय ३२), विस्तार अधिकारी पंचायत समिती कळवण (रा.फुलाबाई चौक कळवण) यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली होती.
आरोपी सरपंच पेसा सदस्य म्हणून कार्यरत असतांना मूल्यांकने व ठराव ग्रामपंचायत निवाने येथे दफ्तरी मिळून आले नव्हते. आरोपी ग्रामसेवक यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत ग्रामनिधी व ग्रामीण पाणीपुरवठा निधीच्या कराच्या रकमा वसूल करुन जमाच केल्या नाहीत. त्यामुळे ही रक्कम कोठे खर्च करण्यात आली याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. तसेच २०१७ ते २०२१ पर्यंतचे सर्व रेकॉर्ड निवाने येथे उपलब्धच झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत मधील एकूण रक्कम आरोपींनी अपहार केल्याप्रकरणी शनिवार (दि.६ जुलै) रोजी तिघा आरोपींना कळवण पोलिसांनी अटक केली असून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता असून आणखी काहीजण यामध्ये सहभागी असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करीत आहेत. दरम्यान निवाने ग्रामपंचायत अपहार प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कळवण पंचायत समितीचे आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा