जामनेर तालुक्यातील जोगलखेडा ग्रामस्थांचा इशारा: राशन दुकानदारावर तातडीने कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
जामनेर तालुक्यातील जोगलखेडा गावातील राशन दुकानाविरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिलेल्या निवेदनात, ग्रामस्थांनी राशन दुकानदाराविरोधात गंभीर आरोप केले होते. निवेदनाची दखल घेऊन आज पुरवठा अधिकारी वैराळकर साहेब यांनी चौकशी केली आहे.
चौकशीदरम्यान, गावातील ग्रामस्थांनी राशन दुकानदाराविरुद्ध अनेक तक्रारी नोंदवल्या. त्यांचे म्हणणे आहे की, राशन दुकानदाराने कमी धान्य वाटप आणि मनमानी कारभार करून अनेक गरजू लोकांना अडचणीत आणले आहे. काही ग्रामस्थांनी असा आरोपही केला की, राशन दुकानदार त्यांना धमकावतो आणि म्हणतो, "तुम्ही कुठेही जा, काहीही करा, माझं काहीच होणार नाही." यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना अधिकच तीव्र झाली आहे. याशिवाय, काही ग्रामस्थांना शंका आहे की, या राशन दुकानदारावर कोणाचा वरदहस्त आहे का, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही.
पुरवठा अधिकारी यांनी चौकशीदरम्यान तक्रार बुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे आढळून न आल्यामुळे दुकानदाराचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, "जर या राशन दुकानदारावर तातडीने कारवाई केली नाही आणि परवाना रद्द करून दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करू.
या प्रकरणी पुरवठा अधिकारी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले असून, लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. मात्र, ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा आहे. गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर ग्रामस्थ या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, आणि आता सर्वांच्या नजरा तहसील कार्यालयाच्या पुढील निर्णयावर लागल्या आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा