मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार –पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 25 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 222 पात्र लाभार्थ्यांचे केवायसी आणि आधार सिडींग न झाल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर विशेष बैठक घेण्यात येणार आहे, ज्यात सर्व बँकांचे प्रतिनिधी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार सहभागी होतील.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बालकल्याण अधिकारी वनिता सोनगत तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पात्र लाभार्थ्यांचे केवायसी आणि आधार सिडींग तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले.जिल्ह्यात 9 लाख 74 हजार 950 अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी 9 लाख 61 हजार 8 लाभार्थ्यांना योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला आहे. मात्र, 1 लाख 7 हजार 222 लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये केवायसी आणि आधार सिडींग न झाल्यामुळे तिसरा हप्ता जमा झालेला नाही. संबंधित प्रक्रियेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या लाभार्थ्यांना तिसरा हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, गाव पातळीवरची यंत्रणा कामाला लावून पुढील दोन दिवसांत हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. याशिवाय, आधार सिडींग न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही पीक विमा आणि अन्य योजनांचे लाभ मिळाले नाहीत. यासाठी विशेष मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांचे आधार सिडींग देखील तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तालुका स्तरावरील समिती सदस्यांच्या अडचणींवरही बैठकीत चर्चा झाली आणि त्या अडचणींवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा