आरोग्य विभागाकडून न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर
जामनेर: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर येथे राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, आशा कुयटे, आणि सिकल सेल कार्यक्रम समन्वयक शिवाली देशमुख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या लैंगिक शिक्षणावर विशेष भर देण्यात आला. वय वर्षे १० ते १९ या गटातील मुला-मुलींच्या मानसिक आणि शारीरिक बदलांबद्दल सखोल माहिती देण्यात आली. यामध्ये किशोरवयीन वयात मुला-मुलींना आई-वडिलांसोबत संवाद साधणे, वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे, आणि या वयात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना कशा कराव्यात, याबद्दल डॉ. पल्लवी राऊत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय, शिवाली देशमुख यांनी सिकल सेल आजाराबद्दलही मुलींना माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी भावनिक, मानसिक, आणि शारीरिक समस्या याबाबत माहितीपत्रक वाटण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु. एन. सुरळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नलिनी पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक सुरेश महाजन, एल. एस. वारके, एम. बी. जोशी, आर. इ. इधाटे, रुपेश बावस्कर आणि मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा