ढालगाव शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगन्नाथ पाटील यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित
जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालगावचे मुख्याध्यापक श्री. संदीप जगन्नाथ पाटील, उपशिक्षक, यांचे मूळ गाव गोद्री, तालुका जामनेर आहे. ते नोव्हेंबर 2013 पासून ढालगाव शाळेत जिल्हा बदलीने पदस्थापित झाले आहेत. 83 पटसंख्या असलेल्या या शाळेने आज 168 पटसंख्या गाठली आहे. त्यांनी 1 ते 4 च्या शाळेचा विस्तार 1 ते 8 च्या शाळेत करून शाळेचे रूपच पालटून टाकले आहे. त्यांच्या कार्यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे आणि शाळा अतिशय सुंदर बनली आहे.
शाळेत सर्व शाळांना डिजिटल करणारा बाला हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संदीप पाटील यांनी राबविला. त्यांनी शाळेतील सर्व 48 विद्यार्थिनींसाठी पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत स्वखर्चाने पहिला हप्ता भरून खाते काढण्याचा नवोपक्रम केला आहे. जामनेर तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी मा. जे. के. चव्हाण, माजी अभियंता जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कॅम्प आयोजित करून सुमारे 210 विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिले. आज त्या विद्यार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा दिव्यांग भत्ता मिळत आहे.श्री. पाटील यांनी जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता चौथीसाठी जे.टी.एस. (जामनेर टॅलेंट सर्च) व इयत्ता पाचवी ते आठवीसाठी 'मिशन शिष्यवृत्ती' हा उपक्रम राबविला. माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन व माजी अभियंता मा. जे. के. चव्हाण यांच्या आर्थिक साहाय्याने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी चार चाचण्यांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी 48 विद्यार्थी तर यावर्षी 59 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरले आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची दखल घेत जिल्हा परिषदेने तो संपूर्ण जिल्ह्यात राबवला.ढालगाव शाळेमध्ये 70 टक्के विद्यार्थी तडवी भिल्ल समाजाचे आहेत. या शाळेतून दरवर्षी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी यश संपादन करतात. यावर्षी पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आहेत. यावर्षी राज्य शासनाकडून ढालगाव शाळेला 50 लाख रुपये किंमतीची फ्युचरिस्टिक लॅब मंजूर झाली आहे, जी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव प्रयोगशाळा ठरणार आहे.ढालगाव येथील डोंगराळ भागातील एक छोटीशी शाळा आज एक ते आठची शाळा बनली असून आठ शिक्षक शाळेला मान्य झाले आहेत. या सर्व यशाचे श्रेय संदीप पाटील यांच्या अथक परिश्रमांना जाते. या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत यावर्षीचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन श्री. संदीप पाटील यांचा सन्मान करण्यात आला आहे.जामनेर तालुक्यातील अनेक क्षेत्रांतून श्री .संदीप पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जामनेर शहरातील ठिकठिकाणी त्यांच्या गौरवाचे बॅनर झळकलेले दिसत आहेत. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा