हजारो भाविकांच्या उपस्थितीत इस्कॉन जामनेर तर्फे जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरी
दि. 5 सप्टेंबर रोजी श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयात हजारो जामनेरवासीयांच्या भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने भगवान श्रीकृष्ण जन्म महोत्सव इस्कॉन जामनेर तर्फे साजरा करण्यात आला. इस्कॉन जामनेरचे *अध्यक्ष श्रीमान रासयात्रा प्रभु* यांनी उपस्थित भक्तांना प्रबोधन करताना सांगितले की, "श्रीकृष्ण जन्मउत्सव हा केवळ एक दिवसाचा नसून, तो नित्य उत्सव आहे जो प्रत्येक जीवाच्या आनंदासाठी आहे." या विचारांतून भक्तिमय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला. या प्रसंगी *ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन*, मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, जितेंद्र पाटील, सौ. संध्याताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, प्रा. शरद पाटील, माजी नगरसेवक श्रीराम महाजन, नगरसेवक बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, जि.प. सदस्य अमित देशमुख, जितेंद्र गोरे, सुनील कलाल, प्रा. एस.आर. महाजन यांच्यासह अनेक मान्यवर व भक्तांनी उपस्थित राहून महाआरतीत सहभागी होऊन आशीर्वाद घेतला.
उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री राधा कृष्णांच्या विग्रहांचे शृंगार दर्शन, शास्त्रोक्त पद्धतीने महाअभिषेक, बाल भक्तांद्वारे सादर केलेले कृष्ण नृत्य व नाटिका, मधुर कृष्ण कथा, भजन कीर्तन आणि सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन इस्कॉन भुसावळ व जामनेर भक्तवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विशेष रूपाने युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले. या उत्सवानिमित्त वर्षभर नित्य साप्ताहिक सत्संग आयोजित केला जातो.
आगामी 24 सप्टेंबरपासून 4 दिवसांची भगवद्गीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, सर्व जामनेरवासीयांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन जामनेरचे अध्यक्ष श्रीमान रासयात्रा प्रभु यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा