धर्मादाय कार्यालयाची परवानगीशिवाय वर्गणी गोळा करणे बेकायदेशीर: गणेशोत्सव, नवरात्रोत्सवांसाठी सूचना
जळगाव, ४ सप्टेंबर- आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोणत्याही सार्वजनिक उत्सव, उपक्रम किंवा कार्यक्रमांसाठी वर्गणी किंवा देणगी गोळा करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवसाय अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये सहाय्यक/धर्मादाय उप आयुक्त, जळगाव यांची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.
पूर्वीच्या प्रक्रियेप्रमाणे, ही परवानगी मिळविण्यासाठी संबंधितांना धर्मादाय कार्यालयात जाऊन आवश्यक फॉर्म आणि कागदपत्रे सादर करावी लागत होती. मात्र, जनतेच्या सोयीसाठी आता ही प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक प्रक्रिया:
1. ऑनलाईन अर्ज: अर्जदारांनी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन युझर आयडी व पासवर्ड तयार करावा. त्यानंतर आवश्यक असलेल्या सर्व माहितीचे ऑनलाइन फॉर्ममध्ये भरणे आवश्यक आहे.
2. आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे: अर्जदारांनी खालील कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे:
- सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव (हस्तलिखीत)
- पदाधिकारी/सदस्यांचे ओळखपत्र (फोटो आयडीची नवीनतम प्रत)
- जागेच्या मालकाचे नाहरकत पत्र/परवानगीपत्र
- नगरसेवक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे मंडळ सदस्याच्या ओळखीबाबतचे पत्र
- मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशोब (लागू असल्यास)
- मागील वर्षीच्या परवानगी पत्राची प्रमाणित प्रत (लागू असल्यास)
परिपूर्ण अर्ज मिळाल्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त, जळगाव यांना योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतरच विहित शर्तीस अधीन ठेवून वर्गणी गोळा करण्यास परवानगी देता येईल.
तक्रारी व कायदेशीर कार्यवाही
कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने वरील प्रक्रिया पूर्ण न करता वर्गणी/देणगी गोळा केल्यास, त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल व त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल. याची सर्व मंडळे आणि सदस्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी सर्व मंडळांनी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त, जळगाव यांनी केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा