जामनेर वाकिरोड जिल्हा परिषद मराठी शाळेत शांतता समितीची बैठक; गणेशोत्सव व ईद-ए-मिलादसाठी प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण सूचना
जामनेर वाकिरोड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत दोन्ही उत्सव शांततेत आणि अनुशासनात पार पडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी नितीन बागुल, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, तुषार पाटील, निलेश घुगे, सचिन महाजन, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना:
1. डीजे व ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण: पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या काळात डीजे वाजवण्यास आवाजाची मर्यादा पाळण्याची सूचना दिली आहे. ध्वनिक्षेपक अधिनियमाचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखली जाईल.
2. मूर्ती विसर्जन आणि मिरवणूक परवानगी: गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणि ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. रॅली किंवा मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
3. बिजली आणि आपात्कालीन सेवा व्यवस्थापन: गणेश आणि ईद मंडळांनी लाईट पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासाठी पोलिस आणि आरोग्य विभाग सज्ज राहतील.
4. आरोग्य आणि स्वच्छता: जामनेर नगर परिषदेच्या वतीने गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या काळात विशेष स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
5. सुरक्षा उपाययोजना:गणेश आणि ईद मंडपांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे, आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन क्रमांकांची माहिती सर्व संबंधितांनी ठेऊन ठेवावी.
6. शांतता व सहकार्य: सर्व गणेश आणि ईद मंडळांनी उत्सव साजरा करताना शांतता आणि सुव्यवस्था राखावी. कोणत्याही प्रकारच्या विवादास्पद कृती टाळून प्रशासनाशी सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीत महेंद्र बाविस्कर यांनी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, "जामनेर शहराला ओळखण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, परंतु कासार साहेबांनी आठ दिवसांत सर्व शहर जाणून घेतले.
ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने विशेष सूचना: ईदच्या काळात कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊ नयेत यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. मिरवणुकीदरम्यान शांतता राखावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला सर्व मंडळांचे पदाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी, व अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा