नेरी येथील गावकऱ्यांची धडाडी.. महापुराच्या संकटात मंदिर आणि पुलाच्या बांधकामाला दिला नवसंजीवनीचा हात - दैनिक शिवस्वराज्य

नेरी येथील गावकऱ्यांची धडाडी.. महापुराच्या संकटात मंदिर आणि पुलाच्या बांधकामाला दिला नवसंजीवनीचा हात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला महापूर आला. अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नेरी बुद्रुक गावाच्या नदीपात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काही संकटे ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु गावकऱ्यांच्या त्वरित आणि सुज्ञतेमुळे एक मोठे नुकसान टळले.
गावातील काही ज्येष्ठ व्यक्ती आणि तरुणांच्या लक्षात आले की, नदीपात्रात होणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या पिशव्या मंदिराच्या ओट्यावर ठेवलेल्या आहेत. कंत्राटदाराचे कामगार उपस्थित नसल्यामुळे या पिशव्या पाण्यात वाहून जाण्याची भीती होती, ज्यामुळे कंत्राटदाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. हे लक्षात येताच, गावकऱ्यांनी त्वरित कंत्राटदार गणेश गोसावी आणि अजिंक्य पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दिली.
गावकऱ्यांनी निर्णय घेतला की सर्व पिशव्या मंदिरात सुरक्षित ठेवण्यात याव्यात. परंतु त्याचवेळी, मंदिराच्या विस्ताराचे काम चालू असल्यामुळे काही पिशव्या या कामासाठी वापरण्याची अट गावकऱ्यांकडून ठेवण्यात आली. कंत्राटदारांनीही मोठ्या मनाने ही अट मान्य केली.
झाले... गावातील तरुण मित्रमंडळींनी उत्साहाने कामाला सुरुवात केली. सुमारे 300 हून अधिक सिमेंटच्या पिशव्या खांद्यावर आणि डोक्यावर वाहून मंदिराच्या पायऱ्या चढून आणल्या. या कार्यात कुणीही कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करत होते. हे सगळे कार्य पाहून, गौरव (मोहन) दिलीप खोडपे यांनी या प्रेरणादायी घटनेचा फोटो काढून तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते की, एकत्रित प्रयत्न आणि एकजूट असल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते. 

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads