आपले सरकार सुविधा केंद्र"च्या गैरप्रकारांवर कारवाई करा – समाजवादी पक्षाचा तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन
जामनेर तालुक्यातील आपले सरकार सुविधा केंद्र"मध्ये सुरु असलेल्या अनियमितता आणि नागरिकांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाविरोधात समाजवादी पक्षाच्या वतीने जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रऊफ शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या केंद्रांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
शासकीय सेवा शुल्काच्या नावाखाली लूट
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागासाठी मंजूर झालेली आपले सरकार सुविधा केंद्रे अनधिकृतपणे जामनेरमध्ये चालवली जात आहेत. या केंद्रांकडून शासकीय दराच्या तिप्पट-चौपट शुल्क आकारले जात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे.
समाजवादी पक्षाच्या प्रमुख मागण्या
1. आपले सरकार सुविधा केंद्रांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
2. सर्व अधिकृत केंद्रांच्या बाहेर शासकीय दरपत्रक सार्वजनिकरित्या लावण्याचे आदेश द्यावेत.
3. परवानाधारक सुविधा केंद्रांची अधिकृत यादी प्रसिद्ध करावी.
4. बेकायदेशीर केंद्रे त्वरित बंद करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी
तालुकाध्यक्ष रऊफ शेख यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर समाजवादी पक्ष गावोगावी जाऊन जनजागृती अभियान राबवेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.निवेदन देताना तालुकाध्यक्ष रऊफ शेख यांच्यासह तनवीर गफ्फार बागवान, शेख रहेमान, शेख आसिफ, जाकीर बागवान, शेख हमीद, मुख्तार शेख, शेख आसिफ शेख अजीज, शेख साबीर शेख बशीर आणि जहीर खान उपस्थित होते.प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा