हावरटपणामुळेच खडसेंची ही अवस्था – मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात
नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत हावरटपणा चालला आहे, तो थांबवावा, असे विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले होते. या वक्तव्यावर टीका करताना जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना चोख प्रत्युत्तर दिले.हावरटपणावर बोलण्याचा अधिकार खडसेंना आहे का? हावरटपणाचे भोग खडसेच भोगत आहेत. रॉयल्टी प्रकरण, पुण्यातील केस आणि त्यांच्या झालेल्या जेलवारीमुळे त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही, असे महाजन यांनी ठणकावले.जामनेर येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाजन म्हणाले, "तुमचा हावरटपणा लोकांनी बघितला आहे. आज तुमची अवस्था काय झाली? कुठे गेलात तुम्ही? दारोदार फिरून लोकांचे दरवाजे ठोठावत आहात. त्यामुळे हावरटपणावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
महाजन पुढे म्हणाले, मी यापूर्वी नाशिकचा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडला आहे. त्यामुळे यावेळीही पालकमंत्री मीच व्हावे, असे नाशिककर, आमदार आणि मुख्यमंत्री यांना वाटते. यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल.
खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत विचारले असता महाजन यांनी उपरोधिक टिप्पणी करत म्हटले, "या संदर्भात त्यांनाच विचारा. ते सतत येत-जात असतात. कधी दिल्लीला जातात, कधी मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यांच्या पक्षप्रवेशाचा सिग्नल देणे-न देण्याचा प्रश्न माझ्या लहान कार्यकर्त्याच्या पातळीवर येत नाही. खडसे मोठे, राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत.महाजन यांच्या या टोलेबाजीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा