जामनेर तालुक्यातील शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी, या दृष्टीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने तालुक्यात भव्य शेततळे
प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा भव्य मेळावा गोंडखेल येथील सुंदराई फार्म, माजी सरपंच आप्पा राजपूत यांच्या शेतात संपन्न झाला.वाघुर उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ अंतर्गत जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेततळ्यांचे
बांधकाम करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुका जलसंधारणात महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 28 गावांमध्ये 2020 शेततळ्यांचे बांधकाम करण्याचे नियोजन असून, या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सतत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे आणि सिंचनाच्या संकटावर मोठ्या प्रमाणात मात करता येणार आहे. भव्य मेळाव्यात हजारो शेतकरी लाभार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, माझे स्वप्न आहे की जामनेर तालुका केवळ सिंचनच नव्हे, तर सर्वच क्षेत्रात राज्यात पहिल्या क्रमांकावर असावा. शेतीला मुबलक पाणी मिळाले, तर उत्पादन दुप्पट होईल आणि शेतकरी अधिक सक्षम होईल.शेततळे ही संकल्पना जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त करत महाजन यांनी या योजनेच्या तातडीच्या अंमलबजावणीचा संकल्प व्यक्त केला. यामुळे तालुका सुजलाम-सुफलाम होईल आणि कृषी समृद्धीच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाईल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा