न्याय न मिळाल्याने जीव देतोय – जामनेर भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
शासनाने न्याय द्यावा म्हणून तीन वेळा मोजणी झाली, पण तरीही माझी जमीन चुकीचीच मोजली गेली... आता मी थेट न्याय मागायला आलोय, पण हा शेवटचा प्रयत्न!” – असे म्हणत खर्चाणे (ता. जामनेर) येथील शेतकरी बाबुराव पाटील यांनी १ मे रोजी सकाळी जामनेर भुमि अभिलेख कार्यालयाच्या आवारातच स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा थरारक प्रयत्न केला.
घटनेने प्रशासनाची झोप उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्याचे प्राण वाचवले. घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या अनास्थेवर संताप व्यक्त केला.बाबुराव पाटील यांच्या सांगण्यानुसार, मागील काही महिन्यांपासून तीन वेळा झालेल्या जमिनीच्या मोजणीत गंभीर त्रुटी आढळल्या असून, याबाबत तक्रारी करूनही भुमि अभिलेख कार्यालयाकडून दुर्लक्षच झाले. अखेर आज त्यांनी थेट जीव देण्याचा प्रयत्न करत शासनाचे लक्ष वेधण्याचा टोकाचा निर्णय घेतला.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येत ९ मे रोजी पुन्हा मोजणी करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले असून, ‘न्याय मिळवायचा असेल तर पेटवावे लागते काय?’ असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा