जळगाव LCB ची मोठी कामगिरी: ठिबक नळया चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, ₹४ लाखांचा मुद्देमाल जप्त
जामनेर तालुक्यातील फत्तेपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतातून चोरीस गेलेल्या ठिबक नळया प्रकरणाचा पर्दाफाश करत जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चतुरसाई तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कामगिरी बजावली. तब्बल ₹४.०५ लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.गु.र.नं. ६३/२०२५ भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यानुसार, फत्तेपुर येथील गट क्रमांक ३९ मधील एका शेतकऱ्याच्या शेतातून ३५ बंडल ठिबक नळया चोरीस गेल्या होत्या. या गंभीर प्रकाराचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, बोदवड रोड, जामनेर येथील शेख अस्लम शेख मेहबुब यांच्या भंगार दुकानात झडती घेण्यात आली. तेथे चोरीला गेलेल्या ठिबक नळया आढळून आल्या. तक्रारदार शेतकऱ्याने वस्तूची ओळख पटवल्यानंतर दुकानदाराने शेख जावेद शेख सुल्तान (३६), इकबाल उस्मान पिंजारी (३०), व आलमगीर रफीक पिंजारी (३५) यांच्याकडून हा माल घेतल्याचे कबूल केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना तातडीने अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
ठिबक नळयांचे ३५ बंडल — ₹१,०५,०००
महिंद्रा बोलेरो पिकअप (गुन्ह्यात वापरलेली) — ₹३,००,०००
एकूण मुद्देमाल — ₹४,०५,०००
सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप. पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश जाधव, पोउपनि शेखर डोमाळे, पोना रणजित जाधव, पोकॉ ईश्वर पाटील, व पोकॉ राहुल महाजन यांनी यशस्वीपणे पार पाडली.ही कारवाई केवळ चोरी उघडकीस आणणारी नाही, तर स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या दक्षतेचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले असून, अशा तत्परतेची अपेक्षा भविष्यातही व्यक्त केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा