वीज पडून महिलेचा मृत्यू; शासनाकडून चार लाखांची मदत जाहीर
जामनेर, १२ मे २०२५
तालुक्यातील बिलवाडी येथे वीज पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रीमती हिराबाई गजानन पवार (वय ३५ वर्षे) यांच्यावर रविवारी (११ मे) सायंकाळी ५.३० वाजता आकाशातून वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज (१२ मे) रोजी तहसीलदार जामनेर, पोलीस निरीक्षक पहूर, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मृत महिलेच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला तात्काळ मदतीचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनुसार मदत प्रक्रियेला गती देण्यात आली असून, नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत शासनाच्या नियमानुसार चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबास ही मदत लवकरच वितरित केली जाणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाच्या वतीने मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले आहे.यावेळी संजय दादा गरुड, कमलाकर पाटील हेही उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा