लग्नाआधीच काळाने घातली झडप – विजेचा धक्का बसून तरुण मजुराचा मृत्यू..
वादळी वाऱ्यामुळे घराची पत्रे सुरक्षित करताना विजेचा तीव्र शॉक बसून एका होतकरू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ७) दुपारी १ वाजता पहूर कसबे येथील लेलेनगरमध्ये घडली. फीरोज तस्लीम शेख (वय २३) असे या तरुणाचे नाव असून तो मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होता. त्याचा लवकरच विवाह ठरलेला होता, मात्र त्याआधीच काळाने त्याला गाठले.फिरोज घराच्या पत्रांवर चढून वजन ठेवण्याचे काम करत होता. त्यावेळी वीजपुरवठा बंद होता, मात्र अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने पत्र्यांमध्ये वीज उतरली आणि त्याला तीव्र झटका बसला. शेजाऱ्यांनी तातडीने फ्युज काढून वीज बंद केली, मात्र तो १० फूट उंचीवरून खाली कोसळला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु आवश्यक वैद्यकीय सुविधा नसल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यावेळी त्याचे हृदय धडधडत होते, मात्र प्राथमिक उपचारांअभावी त्याची स्थिती गंभीर होत गेली. फीरोजच्या कुटुंबियांनी हळहळ व्यक्त करताना म्हटले की, जर पहूरमध्येच अत्याधुनिक उपचार सुविधा असत्या, तर आमचा मुलगा वाचला असता.वेळेवर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याला खाजगी वाहनातून पाळधीपर्यंत नेले गेले. तिथून मागाहून आलेल्या १०८ रुग्णवाहिकेद्वारे जळगाव रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याने अखेरचा श्वास घेतला.
फीरोजच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार असून त्याच्या अकाली निधनामुळे लेलेनगरमध्ये शोककळा पसरली आहे. लग्नाची स्वप्नं पाहणाऱ्या या तरुणाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा