देशात दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा; महाराष्ट्रातील १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिल्स - दैनिक शिवस्वराज्य

देशात दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा; महाराष्ट्रातील १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिल्स

प्रतिनिधी नितीन इंगळे 
मुंबई | जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार बुधवार, दिनांक ७ मे रोजी देशभरात विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drills) राबवण्यात आल्या. महाराष्ट्रातील विविध १६ ठिकाणी एकाच वेळी या मॉक ड्रिल्स घेण्यात आल्या.
मुंबई शहरात क्रॉस मैदान येथे झालेल्या मुख्य मॉक ड्रिलमध्ये सिव्हिल डिफेन्सचे अपर पोलीस महासंचालक प्रभास कुमार, गृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलमध्ये पोलीस, एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, गृह रक्षक दल, लोहमार्ग पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, एनएसएस व एनसीसीच्या जवानांनी सहभाग घेतला.
अणुशक्ती नगर येथे विशेषतः ब्लॅकआऊट मॉक ड्रिल राबवण्यात आली, जिथे विद्युत प्रणाली निकामी झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा सराव करण्यात आला.

याशिवाय राज्यातील उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही या मॉक ड्रिल्सचे आयोजन करण्यात आले.
या सरावाद्वारे राज्य यंत्रणा दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या प्रसंगी कितपत सज्ज आहे, याचे मूल्यांकन करण्यात आले. या मॉक ड्रिल्समुळे सुरक्षा यंत्रणांना समन्वयाचा सराव मिळाला असून, नागरिकांमध्येही सजगता निर्माण झाली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads