जामनेर तालुक्यात १९ मे रोजी 'लोकशाही दिन' –नागरिकांच्या तक्रारींवर थेट सुनावणी - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यात १९ मे रोजी 'लोकशाही दिन' –नागरिकांच्या तक्रारींवर थेट सुनावणी

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
लोकशाहीला बळकटी देण्यासाठी शासनातर्फे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साजरा केला जाणारा 'लोकशाही दिन' जामनेर तालुक्यात १९ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तहसील कार्यालय, जामनेर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या दिवशी तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांना त्यांच्या तक्रारी आणि अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. महसूल, जमीन व मालमत्ता, सामाजिक योजना, तसेच अन्य शासकीय सेवा-सुविधांशी संबंधित समस्या या वेळी ऐकून घेतल्या जातील.

तहसीलदार जामनेर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली तक्रार संबंधित पुराव्यांसह १९ मेपूर्वी तहसील कार्यालयात सादर करावी. लोकशाही दिनाच्या बैठकीत प्रत्येक तक्रारीवर संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरित कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाही दिन म्हणजे शासनाशी थेट संवाद साधण्याची अनमोल संधी आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads