छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत –जामनेरात भाजपा कडून जल्लोषाचा उत्सव
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असलेले १२ दुर्ग ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने आज सर्वत्र आनंदाचा माहोल पाहायला मिळाला. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या मान्यतेसह या ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक गौरव प्राप्त झाला आहे.
या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक निर्णय जाहीर होताच शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह उसळला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष (पूर्व) चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपतींचे किल्ले हे आपल्या शौर्याचे प्रतीक असून आता ते जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतील.
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते जे. के. चव्हाण, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, माजी गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, भाजपा महामंत्री अतिश झाल्टे, मंडळ अध्यक्ष रवींद्र झाल्टे, मयूर पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन, डॉ. संजीव पाटील, युनुस शेख, नामदार महाजनांचे स्वीय सहायक दीपक तायडे, माधव चव्हाण, सुभाष पवार, सुहास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच पेढे वाटून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या ऐतिहासिक घोषणेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगाथेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली असल्याचा सर्वत्र गौरव व्यक्त होत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा