बेघरांना घर मिळालेच पाहिजे– समाजवादी पक्षाचा जामनेर नगर परिषदेला इशाराघर नाही, जागा नाही, पण तरीही प्रशासन मौन… गरजूंसाठी समाजवादी पक्षाचे निवेदन
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
घरकुलाच्या नावावर जाहिरातबाजी होते, पण प्रत्यक्षात खऱ्या बेघरांना घर मिळत नाही अशी तिव्र नाराजी आज समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत जामनेर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
पंतप्रधान घरकुल योजना सन 2018 पासून गरजूंकरिता सुरू झाली असली, तरी जामनेरमधील अनेक बेघर अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. काही लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा असूनही त्यांची घरे मंजूर झाली आहेत. पण ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागाच नाही, अशांचे अर्ज मात्र दुर्लक्षितच राहिले आहेत.
याविरोधात समाजवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष रऊफ शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यांच्यासोबत जहीर खान, अफसर शेख, जाकिर बागवान, रहीम बागवान, शहाबुद्दीन शेख, मो. हुजेफा, असलम शाह, साबीर शेख हे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
रऊफ शेख यांनी सांगितले की,
खऱ्या गरजू बेघर लोकांसाठी शासनाने जागा उपलब्ध करून त्यांना तात्काळ घरकुल मंजूर करावे, अन्यथा समाजवादी पक्षाला रस्त्यावर उतरावे लागेल
गरिबांचे, बेघरांचे हक्काचे घर या योजनेतून मिळणे अपेक्षित असताना, आजही अशा लोकांना निव्वळ कागदोपत्री आश्वासने मिळत आहेत. प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा