जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
राष्ट्रीय लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जामनेर तालुक्यात कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी तालुक्यातील डॉ. संदीप कुमावद व डॉ. किरण पाटील यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात दर आठवड्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले जाते. कॅम्पच्या एक दिवस आधी लाभार्थ्यांना रुग्णालयात दाखल करून आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येते. मागील वर्षभरात तालुक्यात एकूण ११९५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, यामध्ये ८ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, १०५ लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आणि १०८२ स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया यांचा समावेश होता.

फक्त शस्त्रक्रियाच नव्हे तर शस्त्रक्रिया न करता कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या लाभार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. २०२४–२५ या वर्षात ८८ महिलांना प्रसूतीवेळी कॉपर-टी, ३५५ महिलांना पाळणा लांबवण्यासाठी कॉपर-टी, १३० महिलांना अंतरा इंजेक्शन, तर १०७६ महिलांना गर्भनिरोधक गोळ्या व २०४८ पुरुषांना मोफत कंडोम वितरित करण्यात आले.

या कामगिरीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते, नियमित सर्जन डॉ. समाधान वाघ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पहूरचे वैद्यकीय अधीक्षक, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा मोलाचा सहभाग लाभला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानून, यापुढेही कुटुंब नियोजन व जनजागृतीसाठी असेच एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads