जामनेर तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार : सहाय्यक महसूल अधिकाऱ्याने केली तब्बल ₹२१.६३ लाखांची शासकीय फसवणूक
जामनेर तहसील कार्यालयात तब्बल ₹२१.६३ लाखांची शासकीय फसवणूक उघडकीस आली असून या प्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील (रा. भुसावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत महसूल विभागातील भ्रष्टाचाराला चपराक दिली आहे.१२ सप्टेंबर रोजी गट क्रमांक ८३६/२ च्या ७/१२ उताऱ्याची तपासणी करताना वर्ग बदलाची शंका निर्माण झाली. फेरफार नोंद क्रमांक ४२२५६ मधील आदेशावर ई-ऑफिस संदर्भ क्रमांक नसल्याने प्रकरण संशयास्पद वाटले. चौकशीत उघडकीस आले की, मूळ अर्ज तहसीलदारांनी २५ जुलै रोजी नजराणा न भरल्याने निकाली काढला होता.मात्र आरोपी पाटील यांनी फोटोशॉपच्या मदतीने बनावट शासकीय आदेश तयार करून जमिनीचे बाजारमूल्य ₹४३,२६,५७० दाखवत शासनाकडे नजराणा ₹२१,६३,२८५ जमा झाल्याचा खोटा दाखला तयार केला. यासाठी MH016895725202526E हा बनावट चलन क्रमांक वापरण्यात आला. पण GRAS प्रणालीवर अशी कोणतीही नोंद सापडली नाही.तहसीलदार आगळे यांनी आरोपीला सामोरे केल्यावर, पाटील यांनी आर्थिक मोहापोटी आदेश बनावट तयार केल्याची कबुली दिली. त्यांनी व्हॉट्सॲपवर तहसीलदारांना संदेश पाठवून चुकीची कबुली देत शासनाची रक्कम भरण्याची तयारीही दर्शवली.या प्रकरणी जामनेर पोलिसांत C.R. क्रमांक 313/2025 नोंदवून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316, 318, 336(2), 336(3), 337, 338, 339, 340(2), 341(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि स्वप्निल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या धाडसी कारवाईनंतर नागरिकांनी तहसीलदार साहेबांचे कौतुक केले. “शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तहसीलदार आगळे यांचे हे पाऊल स्वागतार्ह व आदर्श ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.दरम्यान, या घटनेनंतर तालुक्यातील सर्व वर्ग २ धारणा जमिनींची फेरतपासणी करण्याची मागणी होत असून महसूल विभागातील अप्रामाणिक कृत्यांवर कठोर आळा घालण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Previous article
Next article

तहसीलदार साहेबांचा हप्ता थकला की असेच होणार...एकट्याने खायचे नाही,नाहीतर धोका होणार.
उत्तर द्याहटवा