महाराष्ट्र
कंदलगाव पंचायत समिती गणात इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात ; संगिताताई पांढरे यांच्या नावाची जोरदार चर्चा....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती गणांमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी हालचालींना वेग दिला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीची चाचपणी जोमात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंद्रुप जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणी मोठी चुरस अपेक्षित आहे.
कंदलगाव पंचायत समिती गणात – कंदलगाव, अकोले, मंद्रुप, गुंजेगाव, मनगोळी, गावडेवाडी, विंचूर व अंत्रोळी या गावांचा समावेश असून, ही जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणात गावडेवाडीच्या विद्यमान सरपंच संगिताताई पांढरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
संगिताताई पांढरे या गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, सरपंच पद सांभाळताना त्यांनी गावडेवाडीच्या विकासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता व सामाजिक उपक्रमांत लक्षणीय बदल घडले आहेत.
मागील काही महिन्यांत विविध सामाजिक उपक्रम, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेली पुढाकार आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे त्या पंचक्रोशीत लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच कंदलगाव पंचायत समिती गणातून संगिताताई पांढरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
राजकीय पातळीवरही त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असून, येत्या काही दिवसांत या गणातील स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा