धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पूरग्रस्तांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, विंचूरचा सामाजिक उपक्रम..... - दैनिक शिवस्वराज्य

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पूरग्रस्तांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, विंचूरचा सामाजिक उपक्रम.....




समीर शेख प्रतिनिधी :
सोलापूर (मंद्रूप) : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय समाजासाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी दिवस. या दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, विंचूर यांच्यातर्फे अकोले (ता. मंद्रूप) येथील पूरग्रस्त व गरजू कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.
   गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महापुराचे संकट ओढवले. सीना नदी व उपनद्यांच्या पाण्याने परिसर जलमय झाला असून अकोले परिसरातील शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे स्मरण करताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त बांधवांना उभारी देण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतला.
   या उपक्रमांतर्गत सकाळचे व संध्याकाळचे जेवणाची सोय करून पूरग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्यात आला. जेवण वितरणावेळी मंडळाचे कार्यकर्ते स्वतः उपस्थित होते. अचानक आलेल्या महापुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना या उपक्रमातून दिलासा व मानसिक आधार मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
   यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश म्हणजे समानता, बंधुता व मानवतेचा धर्म. संकटाच्या काळात समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे कर्तव्य आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल, तर तो समाजहितासाठी काहीतरी करूनच करावा लागतो."
    पूरग्रस्त नागरिकांनी या मदतकार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. “अचानक आलेल्या पुरामुळे आमचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा कठीण परिस्थितीत विंचूर मंडळाने आम्हाला दिलासा दिला. ही खरीच बाबासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
    समाजोपयोगी कार्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, विंचूर यांनी दाखवून दिले की, जयंती म्हणजे फक्त उत्सव नसून ती सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads