नगरपरिषद निवडणुका : 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला मतमोजणी.... - दैनिक शिवस्वराज्य

नगरपरिषद निवडणुका : 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला मतमोजणी....



समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर  :- राज्य निवडणूक आयोगाने स्थगित करण्यात आलेल्या नगरपरिषदा व जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. नव्याने कार्यक्रम जाहीर झालेल्या नगरपरिषदा व जागांसाठी मतदानाची तारीख 20 डिसेंबर 2025 असणार आहे. तर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दि. ०२/१२/२०२५ झालेल्या व दि. २०/१२/२०२५ होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी व निकाल मा. उच्च न्यायालय व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश डोके यांनी दिली.
     राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांनी दि. ०४/११/२०२५ रोजी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायती यांच्या सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुडूवाडी, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ व नगरपंचायत अनगर असे एकूण १२ ठिकाणी दि. ०२/१२/२०२५ रोजी मतदान प्रस्तावित होते.
          निवडणूक नियमातील तरतूदीनुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. यामध्ये मंगळवेढा नगरपरिषद व अनगर नगरपंचायत येथे अध्यक्ष पदाच्या उमेदवाराने अपील केले. नगरसेवक पदासाठी मैंदर्गी येथे एक जागा, सांगोला येथे दोन जागा, मोहोळ येथे दोन जागा , मंगळवेढा येथे एक जागा, बार्शी येथे एक जागा व पंढरपूर येथे एक जागेसाठी अपील करण्यात आले होते. या अपिलांचा निकाल दि. २२/११/२०२५ पर्यंत प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २९/११/२०२५ रोजीच्या आदेशाने सदर जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली. मंगळवेढा व अनगर येथे अध्यक्ष पदाबाबत अपील झाल्याने तेथे संपूर्ण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती, असे श्री. डोके यांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads