जामनेरात मोठा निर्णय... शहरातील दोन प्रमुख मार्ग ‘नो हॉकर झोन’ घोषित नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा – नगर परिषदेची भाजी विक्रेते व हातगाडी धारकांसोबत निर्णायक बैठक
जामनेर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्वच्छतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद जामनेरने ठोस पाऊल उचलले आहे. दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर परिषद सभागृहात भाजी विक्रेते व हातगाडी धारकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील दोन महत्त्वाचे मार्ग “नो हॉकर क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
शिवसृष्टी ते भीमसृष्टी
हे मार्ग आता कोणत्याही प्रकारच्या हातगाड्या, भाजी विक्रेते किंवा फेरीवाल्यांसाठी पूर्णपणे बंद असतील, असे स्पष्ट करण्यात आले.
नगर परिषद मुख्याधिकारी श्री. नितीन बागुल यांनी यावेळी कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, साहित्य जप्ती तसेच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. “शहराच्या शिस्तीसाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
बैठकीस सन्माननीय उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगर परिषद सदस्य आणि मोठ्या संख्येने हातगाडी धारक उपस्थित होते. डॉ. भोंडे यांनी विक्रेत्यांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करत, “अतिक्रमणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर जामनेर घडवण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे आवर्जून सांगितले.
शहरातील नागरिकांना मोकळे रस्ते, सुरळीत वाहतूक आणि स्वच्छ वातावरण देण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. नगर परिषदेकडून येत्या काळात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा