“तक्रारींवर तत्काळ कार्यवाही ; मंद्रूप हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणार” – पोलीस निरीक्षक शंकर पटवारी ३८ गावांत अवैध व्यवसायांना आळा; महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य - दैनिक शिवस्वराज्य

“तक्रारींवर तत्काळ कार्यवाही ; मंद्रूप हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणार” – पोलीस निरीक्षक शंकर पटवारी ३८ गावांत अवैध व्यवसायांना आळा; महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून सण-उत्सव आणि आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मंद्रूप पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिली.
    मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांची सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समिती येथे कार्यरत असलेले शंकर पटवारी यांची मंद्रूप येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
    दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व्यासपीठावर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक शंकर पटवारी म्हणाले, “पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंदवून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू. महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हद्दीतील ३८ गावांत कोणताही अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही. रोडरोमिओंवर कडक कारवाई केली जाईल. तसेच अल्पवयीन व बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या युवकांवर आणि त्यांच्या पालकांवरही कारवाई करण्यात येईल.”
     चोरी, घरफोडी आदी गुन्हे रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असून ग्राम सुरक्षा दल पुन्हा सक्रिय केले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
       या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंचाक्षरी स्वामी यांनी केले, तर आभार अमोगसिद्ध लांडगे यांनी मानले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नितीन वारे, गिरमल गुरव, महेश पवार, अशोक सोनकंटले, सहसचिव शिवय्या स्वामी, कार्याध्यक्ष गुरू गायकवाड, सहकार्याध्यक्ष अभिजीत जवळकोटे, खजिनदार समीर शेख, प्रसिद्धीप्रमुख राहुल उड्डाणशिव, प्रमोद जवळकोटे,  गजानन काळे, बनसिद्ध देशमुख, अप्पू देशमुख, महासिद्ध साळवे आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads