चेन्नईत समुद्रात वाहून जामनेर तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; पाळधी गावावर शोककळा... - दैनिक शिवस्वराज्य

चेन्नईत समुद्रात वाहून जामनेर तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; पाळधी गावावर शोककळा...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील तरुणाचा Chennai येथे समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जय नरेंद्र पाटील (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह काल सापडला. उत्तरीय तपासणीनंतर अ‍ॅम्ब्युलन्सने त्याचे पार्थिव मूळ गावी पाळधी (ता. जामनेर) येथे रवाना करण्यात आले असून आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुमारे सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स गावात पोहोचण्याची शक्यता आहे.जय पाटील हा अभियांत्रिकी पदवीधर असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी Cognizant कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारी सुटी असल्याने कंपनीतील काही तरुण समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आणि जयसह तिघेजण पाण्यात ओढले गेले.
घटनेनंतर जयचा बराच वेळ शोध लागला नव्हता. रविवारीही त्याचा काही पत्ता लागला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अखेर काल त्याचा मृतदेह सापडला आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी सकाळी जयने पाळधी येथील घरी फोन करून मित्रांसोबत फिरायला जात असल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी जयच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही नातेवाईक तत्काळ चेन्नईकडे रवाना झाले.
जय हा पाळधी येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांचा मुलगा आहे. वडील शेतकरी तर आई शिक्षिका असून बहिणीचे बारावीचे पेपर सुरू असतानाच ही दुःखद बातमी कुटुंबावर कोसळली आहे.
दरम्यान, जलसंपदा मंत्री Girish Mahajan यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना दिली. मुख्यमंत्री यांनी Tamil Nadu सरकारशी संपर्क साधून मदत व बचावकार्याची माहिती घेतल्याचे समजते.
जयच्या अकाली निधनामुळे पाळधी गावासह संपूर्ण जामनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. होतकरू, हुशार आणि स्वप्नाळू तरुणाच्या अशा दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज संध्याकाळी त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads