महाराष्ट्र
बरूर येथील ‘श्री आदिशक्ती फायनान्स’चा १.११ कोटींचा घोटाळा उघड ; ४८ ठेवीदारांची फसवणूक, मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे कार्यरत असलेल्या ‘श्री आदिशक्ती फायनान्स’ या संस्थेमार्फत ठेवीदारांची तब्बल १ कोटी ११ लाख १७ हजार ६३० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निर्मला गणेश चौगुले (वय ५०, रा. बरूर ता. दक्षिण सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोपी प्रकाश मुकुंदा इटकर (मयत) व संजय प्रकाश इटकर (रा. बरूर) यांनी ‘श्री आदिशक्ती फायनान्स’ ही संस्था सुरू करून ठेवीदारांना वार्षिक २४ टक्के आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले.
पिग्मी व रोख स्वरूपात मुदत ठेवी स्वीकारून फिर्यादीसह तब्बल ४८ ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली. मात्र मुदत पूर्ण होऊनही ठेवीची मूळ रक्कम व व्याज परत न करता संगनमताने विश्वासघात करून अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता १९६० चे कलम ४१८, ४२०, ४०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचा (वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. एएसआय पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा