“मंद्रूपमध्ये ‘समाधान शिबीर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, १०० जणांना मोफत वाळू पास”.... - दैनिक शिवस्वराज्य

“मंद्रूपमध्ये ‘समाधान शिबीर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, १०० जणांना मोफत वाळू पास”....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप मंडळातील नागरिकांसाठी महात्मा गांधी भवन, मंद्रूप येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘समाधान शिबीर’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष बापू देशमुख होते.
   नया शिबिरात विविध शासकीय विभागांकडून नागरिकांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ देण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची हिमोग्लोबीन, शुगर व बीपी तपासणी करण्यात आली तसेच आयुष्यमान भारत कार्ड व वयवंदना कार्ड नोंदणीही करण्यात आली.
    यावेळी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या ५१ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने शासकीय घरकुल योजनेत मंजूर झालेल्या १०० लाभार्थ्यांना मोफत २ ब्रास वाळूचे पास देण्यात आले.
    भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ई-मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाने बेबी किटचे वाटप केले. कृषी विभागाने महाडीबीटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर आदी कृषी अवजारे वितरित केली.
    महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला बचत गटांसाठी विविध योजनांची माहिती, तर पशुसंवर्धन विभागाने शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले. तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचे आदेश, १५५ अन्वये ७/१२ दुरुस्तीचे आदेश आणि भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्याचे आदेश नागरिकांना वितरित करण्यात आले.
   शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘समाधान शिबीर’ माध्यमातून सर्व विभागांच्या योजना एकाच छताखाली व मंडळ स्तरावर उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे सांगत परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुभाष बापू देशमुख यांनी केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विष्णू बुटे यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती संदीप टेळे, जि.प. सदस्या सोनाली कडते, जि.प. सदस्या सविता उंबरजे, मंद्रूपच्या सरपंच अनिता कोरे, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, वांगीचे सरपंच हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार अश्विनी दराडे, मंडळ अधिकारी जोतीराम पवार, राणा वाघमारे, गजानन जाधव, ग्राम महसूल अधिकारी रावसाहेब कोकरे, विश्वनाथ पवार, प्रीती साळुंके, सीमा चवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मगर यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads