महाराष्ट्र
सागर सिमेंट-एम. के. फाउंडेशनचा शिक्षणासाठी मोठा हातभार ; एक लाख वह्या वाटपाचा संकल्प...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे खंडित होऊ नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सागर सिमेंट व एम. के. फाउंडेशनतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक लाख वह्या मोफत वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळाला असून, यंदा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सध्या वाढत्या महागाईमुळे अनेक शेतकरी व कष्टकरी कुटुंबांना मुलांच्या शिक्षणावरील खर्च पेलणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे येऊ नयेत आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करता यावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील जिल्हा परिषद शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सागर सिमेंट महाराष्ट्र राज्य व एम. के. फाउंडेशनचे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
“विद्यार्थ्यांच्या हातात वह्या आणि डोळ्यांत स्वप्ने देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हीच आमची प्रेरणा असून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
१५ जूनपूर्वी मागणीपत्र सादर करण्याचे आवाहन...
या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद शाळांनी शाळेच्या लेटरपॅडवर विद्यार्थ्यांची एकूण संख्या, इयत्तानिहाय आवश्यक वह्यांची माहिती, शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव व संपर्क क्रमांक नमूद करून दि. १५ जून २०२६ पूर्वी सागर सिमेंट कार्यालय, सोलापूर येथे मागणीपत्र जमा करावे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा