अंत्रोळीत विद्यार्थ्यांच्या भव्य दिंडीने जपली वारकरी परंपरा ; विठ्ठलनामाच्या गजराने गाव दुमदुमले - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळीत विद्यार्थ्यांच्या भव्य दिंडीने जपली वारकरी परंपरा ; विठ्ठलनामाच्या गजराने गाव दुमदुमले


समीर शेख प्रतिनिधी 
अंत्रोळी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत टाळ-मृदुंगाच्या गजरात काढलेल्या दिंडीमुळे संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले.
दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम"चा जयघोष करत वारकरी नृत्य, अभंग, कीर्तन, भक्तिगीते आणि समाजप्रबोधनपर संदेशांचे सादरीकरण केले. दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळी काढून तसेच पालखीचे पूजन करून उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.
     कार्यक्रमात श्रीरंग बनसोडे यांनी विठ्ठलभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून टाकले. नागनाथ म्हमाणे यांनी सादर केलेल्या वारकरी नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. किर्ती जाधव, बनसोडे व राठोड मॅडम यांनी सादर केलेल्या पारंपरिक वारकरी नृत्य व फुगडीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढविली.
    या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक युवराज राठोड यांच्यासह श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाणे, किर्ती जाधव, बनसोडे मॅडम आणि राठोड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
     या दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, सामाजिक ऐक्य आणि संस्कार यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत भविष्यातही अशा संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads