वरणगाव–तळवेलमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराने संताप; आरोपींना कठोर शिक्षा द्या, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
वरणगाव | तळवेल : वरणगाव–तळवेल परिसरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महिला विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणात संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर करणी सेनेच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन सादर करून प्रकरणाचा तपास जलदगतीने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी करण्यात आली.
अल्पवयीन पीडित मुलीला या घटनेमुळे मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने तिच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. पीडितेला आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, मानसिक आधार आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
करणी सेनेच्या प्रमुख मागण्या
सदर प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने करण्यात यावा.
उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
आरोपी दोषी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर सक्षम न्यायालयात प्रभावीपणे खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यात यावी.
पीडित अल्पवयीन मुलीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात यावी.
पीडितेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.
तिला आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, मानसिक आधार आणि शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेले सर्व सहाय्य मिळवून देण्यात यावे.
पुरावे नष्ट करण्याचा, पीडितेवर दबाव आणण्याचा किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
तपास योग्य पद्धतीने पूर्ण करून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
“अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र राज्य सदैव तिच्या पाठीशी राहील,” असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सारिका ताई पाटील, तालुकाध्यक्ष जयश्री पाटील, जिल्हा सचिव कविता पाटील, श्रद्धा राजपूत, प्रियंका राजपूत, तसेच करणी सेनेचे कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, संदीप राणा, नितीन पाटील, प्रदीप पाटील, आनंदा पाटील, पंकज पाटील, दिवाणसिंग राजपूत, चंदू चव्हाण, सुरेश पाटील, दयानंद पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
करणी सेनेने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने आणि कायदेशीर चौकटीत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा