थोरगव्हाण ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ‘बंपर बोनस’!सरपंच व ग्रामसेवकांच्या हस्ते एक महिन्याचा पगार बोनस, कपडे आणि मिठाईचे बॉक्स वाटप; इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा आदर्श!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
थोरगव्हाण (ता. रावेर, जि. जळगाव) : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण! हाच आनंद आपल्या कर्मचाऱ्यांसोबत वाटून घेत थोरगव्हाण ग्रामपंचायतीने एक कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. दिवाळीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस स्वरूपात देण्यात आला. तसेच नवीन कपडे आणि मिठाईचे बॉक्स देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत सरपंच रेखा शालिक तायडे आणि ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बोनस, कपडे व मिठाईचे बॉक्स वितरित करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. गावातील स्वच्छता, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांना सेवा देणे तसेच गावाच्या विकासकामांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असते. त्यांच्या मेहनतीची दखल घेत दिवाळीच्या आनंदात कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा थोरगव्हाणचा आदर्श
थोरगव्हाण ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ दिवाळी भेटीपुरता मर्यादित नसून कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणारा सकारात्मक संदेश आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही थोरगव्हाणचा आदर्श घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन आणि सन्मान मिळाल्यास त्यांच्या कामातील उत्साह वाढण्यास निश्चितच मदत होईल.
याप्रसंगी उपसरपंच नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य धीरज चौधरी, सतीश चौधरी आदी उपस्थित होते.
गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या मेहनतीची कदर झाली पाहिजे! थोरगव्हाण ग्रामपंचायतीचा हा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा
कर्मचाऱ्यांचा सन्मान, हीच खऱ्या अर्थाने दिवाळीची गोडी
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा