जामनेर तालुक्याची महसूल वसुलीत विक्रमी कामगिरी – १५२.८६ टक्के वसुली; जिल्ह्यात दुसरा क्रमांक
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर :जामनेर महसूल विभागाने सन 2024-25 या आर्थिक वर्षात विक्रमी कामगिरी करत उद्दिष्टाच्या 152.86 टक्के इतकी जमीन महसूल व गौण खनिज वसुली केली आहे. ही वसुली गेल्या काही वर्षांतील उच्चांक ठरली असून, जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये जामनेरचा दुसरा क्रमांक लागतो, ही बाब उल्लेखनीय आहे.प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रपत्र ‘अ’ अंतर्गत जमीन महसूल, बिनशेतीसारा, नजराणा आदीतून तब्बल 331.77 लक्ष रुपये, तर प्रपत्र ‘ब’ अंतर्गत गौण खनिज परवाने, अवैध गौण खनिज दंड, स्टोन क्रशर आदी माध्यमांतून 1196.80 लक्ष रुपये, असा एकूण 1528.61 लक्ष रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. यावर्षीचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांवर नेऊन 152.86 टक्क्यांपर्यंत पोहोचवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षात ही वसुली 119.41 टक्क्यांवर होती.या यशस्वी वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी जळगाव विभागाचे श्री. विनय गोसावी, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे, तसेच सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांच्या समन्वयातून व नियोजनातून ही वसुली शक्य झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.जिल्ह्यात महसूल वसुलीच्या क्षेत्रात जामनेरने घेतलेली ही झेप इतर तालुक्यांसाठी आदर्श ठरणारी आहे, असेही मत व्यक्त होत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा