आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा...
जळगाव दि. 2 एप्रिल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो (अहमदाबाद) सहलीसाठी संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा समावेश असून, त्यांना आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, या सहलीतील अनुभव लेखी स्वरूपात कळवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील प्रत्येक वयोगटातून प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली. एकूण 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक-कर्मचारी या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा प्रवास रेल्वेने होणार असून, परतीचा प्रवास विमानाने करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रो व विज्ञान केंद्र भेट
या सहलीत विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच, ते सायन्स सिटीमधील एक्वेरियम, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
"विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांची जिज्ञासा वाढावी आणि भविष्यात ते स्वतःला सिद्ध करावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवही मिळतो. भविष्यात देखील अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना देण्यात येईल," असा विश्वास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केला.सहलीचे नियोजन आणि योगदान
या सहलीचे नियोजन शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, विश्वास गायकवाड आणि एल. एम. पाटील यांनी परिश्रमपूर्वक केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ही अनमोल संधी मिळाली आहे.
Maharashtra DGIPR Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा