जामनेरात कायदा-सुव्यवस्थेचा धडाका – पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात कायदा-सुव्यवस्थेचा धडाका – पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ


जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहराच्या पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी अवैध धंदे, गुन्हेगारी आणि समाजविघातक प्रवृत्तींचा चक्काचूर करण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरात विविध ठिकाणी अवैध व्यवसाय, मटका, जुगार, आणि दारू तस्करीच्या घटना समोर येत होत्या. मात्र, कासार यांनी सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवाया करत अनेक अवैध धंद्यांना आळा घातला. धक्कादायक बाब म्हणजे, काही तथाकथित प्रभावशाली मंडळींना ही कासार यांच्या धडाकेबाज शैलीमुळे धसका घ्यावा लागला आहे.जामनेरमध्ये कायदा मोडणाऱ्यांना कुठलीही सवलत दिली जाणार नाही, असे ठामपणे सांगत पोलीस निरीक्षक कासार यांनी थेट गुन्हेगारांनो, सुधरा नाहीतर शहर सोडा असा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीती पसरली आहे.
फक्त कारवाई पुरती मर्यादित न राहता, कासार यांनी "पोलीस तुमच्या दारात" असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात जनसंवाद बैठकांचे आयोजन केले जाते. यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुरावा संपुष्टात आला आहे.नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव, नवरात्र, विजयादशमी या सणांमध्ये उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून कासार यांनी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. नागरिकांमध्ये त्यांच्या नियोजनाची चर्चा आहे आणि स्थानिक व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्ग त्यांचे कौतुक करत आहेत.गुन्हेगारीला आळा घालण्याच्या त्यांच्या या धडाडीच्या शैलीमुळे जामनेरकर त्यांना सिंघम झुंजार अधिकारी, कायद्याचा कडक रखवालदार अशा विशेषणांनी गौरवू लागले आहेत.जामनेर शहरात एक नवा विश्वास निर्माण करणाऱ्या आणि कायद्याच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचे अभिनंदन जनता अशाच सक्षम पोलिसी कार्यपद्धतीची अपेक्षा करत आहे

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads